Friday, 12 October 2018

बाप्पा

हा येतो काय,
दीड दिवस पाहुणचार करवून घेतो काय...
नी जरा कुठे घरातली इतके वर्षांची कर्ती नी आता 'मार्गदर्शक' झालेली  मंडळी, आपल्या नातवंडांना घेऊन  शिळोप्याच्या गप्पा मारायला बसताय्त,
तोवर पुनःश्च पुढल्या प्रवासाला निघतो काय...

गेली नव्वद वर्ष हीच प्रथा सुरू आहे...

सुमारे चार पिढ्या...
 एकेका घरात कितीएक 'रोल' चेंजेस पाहीले असतील त्यानं आजवर...

काल पर्यंत आईच्या मागे मागे फिरणारी पोरं टोरं, आज गणपतीच्या आगमनाला नी प्रस्थानाला स्वतःहून मुर्ती उचलताहेत... आरत्या घेताहेत, पूजा करताहेत....

काल पर्यंत आरत्या, पूजा करणारी पिढी आज ह्या नव्या पिढीच्या खांद्यावरून, फक्त 'सगळं नीट सुरू आहे ना..' बघत हाती टाळ, झांजा घेऊन शांतपणे उभे राहाताहेत...

कालचं मस्त परकर पोलकं घालून घरभर फिरणारं पिल्लू आज आईला, काकवांना विचारत उकड काढत्ये.. मोदक वळायला मदत करत्ये....

कालच खारीच्या पावलानी आलेली एखादी सुनबाई, आज 'आई, तीन वाट्या खोबरं नी दोन वाट्या गुळ घेऊना?' म्हणत स्वैपाकघराचा ताबा घेत्ये..

काल जातीनं सारणात गुळ किती, तार कशी हवी हे ठरवणारी एखादी सासुबाई, आज आपलं बॅटन पुढल्या पिढीकडे देऊन आपल्या नातवंडांच्या जेवणखाणाचं बघत किंवा वाती वळत, फुलांची, पत्रीची जुळवाजुळव करत बसल्ये...

सगळंच स्वप्नवत....!

------

यार गजानना....

अभी अभी तो आये हो...
बहार बनके छाये हो..
अभी तो कुछ कहा नही....
अभी तो कुछ सुना नही....

बुरा ना  मानो  बात का...
ये प्यार है गिला नही.....

अभी ना जाओ छोडकर....  
के दिल अभी भरा नही....।

महाभारती

#महाभारती

आटपाट नगर होतं, तिथं एक राणी राज्य करत होती...
तिला दोन मुलं...

राज्य तसं मोठ्ठं, एकेकाळी सोन्याचा धूर निघणारं... पण लोकं मुळातच सज्जन, पापभिरू...
तर अशा या राज्याच्या राणीचा मुलगा, जो की गादीचा वारस, तो  परगावी शिकायला होता.
आता हे राज्य तसंही बर्याच हितशत्रूंच्या डोळ्यात खुपत होतं.. तस्मात् इथल्या गरीब बिच्चार्या लोकांच्या भोळेपणाचा फायदा घेऊन हे राज्य धूळीला मिळवून इथल्या लोकांना आपल्याकडे ओढून घ्यायची योजना शत्रूंनी आखली.

नी त्या योजने द्वारे, त्या परगावी शिकायला असलेल्या राजपुत्राला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी तो राजकुमार ज्या खानावळीत जेवायला जायचा, तिथेच एका सुंदर वारांगनापुत्रीची वाढपिण/दासी म्हणून योजना करण्यात आली..
यथावकाश त्या वारांगनापुत्रीने त्या राजकुमाराला स्वतःच्या मुठीत घेतलं. नी राजकुमारानं तिच्याशी लग्न करायचा ध्यास घेतला.
राणी मोठी जहांबाज, तिनं आधी ह्या लग्नाला विरोध केला खरा... पण पुढे पुत्रहट्टापुढे तिचं काई चाललं नाही. आणि त्या वारांगनापुत्री रूपी शत्रूंच्या हेरानं राज्यात प्रवेश केला.

होता होता राणी गेली...

तिच्या मागून हा राजकुमार सम्राट बनला खरा, पण खरा राजकारभार ही शत्रूची हेरच चालवायची. राज्य आणि इथल्या लोकांना खिळखिळं करण्यासाठी परगावच्या  साधुसंतांची आयात, राज्याच्या सैन्यदलांचं खच्चीकरण वगैरे सुरू झालं...
राजाला जसा तिचा डाव कळला, तसं त्यानं विरोध केलान, पण बोलून चालून ती शत्रूचीच हेर.. तिनं बिनबोभाट राजाचा काटा काढला...

हळूहळू राज्यातल्या सत्तेची सूत्र आपल्या हातात घेतली...

इथली जनता ही बिच्चारी भोळी...
त्यांनीही तिच्यावर विश्वास टाकला डोळे झाकून...
मग तिनं देशाच्या शत्रूंच्या इशार्यावरून  गलिच्छ राजकारण करत राज्यच उद्ध्वस्त करायला घेतलं...
 मंत्रीमंडळ्यातल्या जुन्या जाणत्या राज्यप्रेमी लोकांना सत्तावर्तुळाबाहेर काढलं जाऊ लागलं.. आणि तिथे चोर, दरोडेखोर, भाट अशांची वर्णी लागायला लागली.

जनता सगळं पाहात होती...
त्यातली काही जणं तेव्हाच जागी झाली होती... त्यांनीच प्रयत्न करून
मधे एकदा परिवर्तन घडवून एका देवमाणसाला इथली सत्तासुत्र दिली... त्यानंही त्या संधीचं सोनं केलं...
पण कुणाची दृष्ट लागली काय माहीत,
देशातील बहुतांश जनता खोटेपणाला भुलली आणि   पुन्हा एकदा त्याच वारांगनापुत्रीच्या हाती सत्तासुत्र गेली आणि परगावची असल्यानं 'थेट राज्ञीपद' मिळणार नाही हे कळल्यानं तिनं एका बाहुलीच्या रूपात इथला कारभार करायला सुरवात केली....
त्या राजवटीत नुस्ता सगळीकडे लूट, भ्रष्टाचार बोकाळला...
आणि मग सुरू झाला त्या शत्रूंचा नंगानाच...
मेलेल्यांच्या टाळूवरचं लोणी खात ती राज्ञी नी तिची पिलावळ अक्षरशः राज्याचे लचके तोडू लागले...

 इकडे राणीचा, डोक्याने जरासा अधु आणि त्यामुळेच परकीय शत्रूंच्या हातातलं बाहुलं बनायला उत्तम असा धाकटा मुलगा एवहाना वयात आला....
रोज उठून नवे नवे तारे तोडू लागला...
आपल्या भावी राजाची ही तर्हा  आणि रोजच्या रोज उघडकीला येणार्या राणीच्या पिलावळीच्या चोर्या, ह्यामुळे जनता अगदी कासावीस झाली....

शेवटी काही काळापुर्वी जनतेनं निर्धार करून त्या दुष्ट, शत्रूहेर वारांगनापुत्रीला पदभ्रष्ट केलं आणि आपल्यातल्याच एका कर्तबगार माणसाला आपला सेवक म्हणून नेमलं.
तो ही माणूस जनतेचा विश्वास सार्थ ठरवत राज्याच्या उद्धाराची कामं करू लागला. आल्याआल्या त्यानं
राज्याला लुटणार्या मंडळींची खबर घ्यायला सुरवात केली, राज्यभरात अनेक लोकोपयोगी कार्यक्रम सुरू केले , सैन्याला पुन्हा बळकट करण्यासाठी प्रयत्न करायला लागला.
 राज्यातल्या लोकांना रोजगार मिळावा ह्यासाठी राज्यात नवनवे व्यवसाय उभारणे , शेतकर्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य मोबदला मिळावा ह्यासाठी कायदा , राज्यातल्या माताभगिनींचा त्रास कमी करण्यासाठी विविध योजना ह्या सर्वांयोगे त्यानं दूरगामी फायदा देणारे जनतेच्या भल्याचे अनेक प्रकल्प हाती घेतले.

चोरी आणि लूटीवर आळा घालण्यासाठी केलेल्या त्याच्या योजनांमुळे राणीच्या पिलावळीचं पितळ उघडं पडून बरेच चोर राज्याबाहेर पडू लागले. त्यांनाही पकडण्यासाठी जाळं घातलं गेलं.
एवढंच काय, ती वारांगनापुत्री आणि तिचा तो अर्धवट लेक दोघं स्वतःही एका चोरीच्या प्रकरणात अडकले.
आणि सुरू झाली अटीतटीची लढाई....

त्या सेवकावर, त्याच्या सहकार्यांवर ती वारांगना, तिची पिलावळ आणि तिचा तो अर्धवट लेक रोजच्यारोज वाट्टेल तसे आरोप करू लागले....
 वर्षानुवर्षांच्या गुलामीनं आणि चोरीच्या धंद्यात पिढीजात थोडाथोडका हिस्सा असल्यानं  आंधळे झालेले काही गुलाम अजूनही त्या राज्यद्रोही राणीची भलामण करीत होते.

पण जनता आता सुज्ञ झाली होती....
ती योग्य तो निर्णय घेणार होती......

----
ही गोष्ट आज' वर येऊन थांबल्ये....
इथून पुढे ती काय वळण घेईल आणि राज्याचं काय होईल हे त्या राज्यातल्या सुज्ञ जनतेच्या हातात आहे...

महात्मा

साल्ला,
इतके वेळा प्रयत्न करून झाले पण साधी सिगरेट नै सुटते...

लग्न झालं, सोन्यासारखी बायको आणि गोजिरवाणं पोर मिळालं तरी अजून रस्त्यावरून चालत/वाहन चालवत जाताना प्रेक्षणीय स्थळांकडे 'तिरका कटाक्ष' जातोच...

मोदीबाबा इतके जीव काढून सांगताहेत, तरीही ड्राईव्ह करताना पेटवलेल्या सिगारेटचं थोटूक अजूनही तसंच वाट्टेल तिथे टाकलं जातं..

हाफीसच्या कामासाठी फिरताना सकाळच्या ब्रंचवर  दिवसभर आपोआप काढला जातो, पण ठरवून 'उपास' करायचं म्हटलं की साबुदाणा खिचडी लागतेच...

'शब्दानं शब्द वाढवून काहीही मिळत नाही, हे अनेकदा कळूनही, आता तिशी उलटून गेल्यावर 'अरे ला का रे' करायची खाज कमी झाली असली तरी अजून पूर्ण गेलेली नाईये..
---

अस्खलीत आचरणाचा विडा उचलून तसं वागताना नैसर्गिकरीत्या वा मुद्दामहून समोर  आणल्या गेलेल्या  परिस्थितीतही न चळता स्वतःचा दृढनिश्चय जपणं हे येरागबाळ्याचं काम नाही....

इथे तो 'महात्मा'च पाहीजे....

नर-नारायण

मगाशी मोदीशेठ नी पुतीनकाकांची गळाभेट बघुन आज्जी म्हणाली "मोदींचं म्हणजे ज्यांच्या ज्यांच्याकडे म्हणून जातील त्या सगळ्यांशी मैत्री..."

मला एकदम नारायण आठवला....
"नारायणाची म्हणजे जाईल तिथे ओळख हं.."...!

नारायण....

निस्वार्थपणे किती एक शुभकार्य जमवणारा...

लग्नघरात 'मुहुर्तासाठीच्या पंचांगापासून ते वरातीच्या बॅडवाल्यांपर्यंत'  चौफेर लढणारा...

सगळ्या साळकाया-माळकाया घेऊन स्वस्तातल्या पण उत्तम प्रतिच्या बस्त्यासाठी नी दागदागिन्यांसाठी अख्खा लक्ष्मी रोड पालथा घालणारा...

सगळी कामं एकेका निष्णात व्यक्तीच्या हातात देऊनही जातीनं प्रत्येक कामावर बारीक लक्ष ठेवणारा...

नी इतकं सगळं असुनही दागिन्यांचा डबा ठेवलेल्या फडताळाची चावी आपल्या काखोटीला घेऊन फिरणारा...
प्रसंगी स्वतः बोहलं झाडणारा...
नी मुहुर्ताच्या वेळी दोन अक्षता उडवून पुढल्या कामाला पळणारा...

लग्नघरात चहू बाजूंनी होणार्या हल्ल्याला समर्थपणे तोंड देत तहान-भूक-झोप विसरत खिंड लढवणारा....

---

.
.
.

नी कार्य संपल्यावर
"आपण एवढं काम केलंय, आता लोकांनी आपल्याला आपल्या पुढच्या पिढीला मान द्यायलाच हवा" असली कुठलीही फालतू अपेक्षा न धरता
आणि
 इतर कुणाला फारशी तोशीस लागु न देता,
तिथेच एखाद्या कोपर्यातल्या कोचावर अंग पसरणारा....

========

तो तिथं आहे म्हणून जरा कुठे वाटेवर येत चाललंय हे सगळं....
नाईतर ह्या घरभेद्यांनी  देश विकायलाच काढलाव्हता सगळी लाज कोळून पीत...

Friday, 4 September 2015

एका अश्रापाचा मृत्यू..!


गेले दोन दिवस 'तुर्कस्थानी' किनार्यावर वाहुन आलेल्या एका सिरियन चिमुकल्याच्या निष्प्राण कलेवराचा फोटो नी त्यावर सोडले जाणारे व्होल लॅाट सुस्कारे ह्यांचा अगदी पूर आलाय सोशल मिडिया वर..!
                                    खरं सांगतो..     
रोज रात्री माझं कोकरु जेव्हा  माझ्या किंवा त्याच्या आईच्या कुशीत शिरुन झोपतं तेव्हा असंच गोड दिसतं..
पहिल्यांदा हा फोटो पाहीला तेव्हा नखशिखांत हादरलो..    टचकन पाणी आलं डोळ्यात..           
छोटासा लाल लाल टी शर्ट, निळी चड्डी, पायात 'बुटु', तांबुस केस.. निघाली असेल स्वारी आईचा वा बाबाचा हात धरुन.. आईने सांगितलं असेल कदाचित ' चला शोनुड्या, भुर जायचं ना?' त्यावर त्या येडुनी मस्त मान डोलावली असेल..
विस्थापितांनी, काठोकाठ भरलेल्या बोटीवर चढताना कदाचित घाबरलंही असेल ते पिल्लु इतकी गर्दी पाहुन.. मग बाबानी एका हातानी बॅगा सावरत दुस-या हातानी ह्याला कडेवर घेउन समजावलं असेल.. ' झालं शोन्या, दोनच दिवस इथे राहायचं कि मग आपण आत्या/ काकुकडे जाणार ' असं काही बाही.. समजुन हसला असेल हा..
आईच्या कडेवर बसुन समुद्र पाहाणार्या
  ह्या सोन्याचे मऊमऊ केस समुद्राच्या खार्या वार्यावर उडत असतील.   आईनी लगेच त्याचे केस सारखे केले असतील..  इतक्यात, काहीसं खायला घेउन ह्याचा बाबा आला असेल.. तो ही आई कडुन छान भरवुन घेतोय, आज आपण घरी नाही, पटकन खाउन घेउ हे कळलय का त्याला?
खाऊ खाउन झाल्यावर हळु हळु बाळोबा पेंगायला लागलेत.. बाबानी बोटीच्या मागल्या भागात एक कोपरा शोधुन तीथं आईला बसु दिलय नी आईच्या मांडीवर हे बाळ गोड हसत हसत झोपलय.. आई थोपटत्ये.. बाजुला उभा असलेला बाबा आता शेजा-याशी गप्पा मारतोय.. पुढं काय करायचं कुठे जायचं ह्याचा हिशोब मांडतोय बहुतेक..
इतक्यात पुढल्या बाजु कडुन गलका ऐकु येतोय.. लोकांच्या झुंडीच्या झुंडी बोटीच्या मागल्या भागा कडे येतायत.. कोणितरी ओरडलं.. बोट बुडत्ये..
बाबा नी आता आई नी बाळाभोवती स्वत:ला ओणवं तोललय.. गर्दीचा त्रास नको व्हायला बाळाला म्हणुन..
अजुन काही क्षण जातात..  
एव्हाना सगळा अवकाश लोकांच्या आरोळ्यांनी, बायका- पोरांच्या रडण्यानी व्यापुन गेलाय..  आपला गोडुला पण ह्या आवाजानी जागा झालाय.. पण आई बाबा आहेत जवळ म्हणुन शांत आहे..  तेवढ्यात काहीतरी धक्का बसतो.. नी बोट हादरते.. इतका वेळ ओणवा असलेला बाबा आता उभा राहीलाय.. आईसुद्धा ह्याला सावरत कशीबशी उभी राहात्ये.. बाळ गांगरलय.. 
लोकं आता पुरती भैसाटल्येत.. वाटेत येइल ते आणि त्याला तुडवत आता त्यांना बोटीची न बुडालेली बाजु गाठायच्ये.. अशाच एका पळणार्याचा धक्का बाबाला लागतो, बाबा पुढे आईवर रेलतो नी आई कडेवरच्या बाळासकट पाण्यात फेकली जाते..    


हे अचानक काय ओलं ओलं नी गार गार?
नी हे काय जातय माझ्या नाकात..?
आई ?   
आई?
बाबा?
 कुठाय आई?
म    माझ.. माझी..        आ...?

आणि क्षणभरात संपलं असेल का सगळं?         

असंच घडलं असेल का?
कुठे गेली असेल त्याची आई? नी बाबा? तो कुठं गेला असेल?   ते तरी जगले असतील का?

आणि अशाप्रकारे अत्यंत दुर्दैवी अंत झालेल्या एका बाळाचे फोटो काढणारा नी ते प्रसारित करणारा महाभाग कोण असावा बरं?
इतका हलकट - नीच इसम ह्या भुतलावर असु शकतो?

नी पश्चिमी देश तिथल्या मिडिया मार्फत हा फोटो उचलुन धरतायत? युद्धबंदीसाठी दबाव आणण्या करता एका २-३ वर्षाच्या पोराच्या कलेवराचे फोटो वापरताय रे भाडखाउंनो?

लाजा नाही वाटत एकालाही?

उद्या देव न करो पण तुमचं मुल असं कुठं मरुन पडलं असेल तर त्याचे फोटो काढुन दाखवाल का रे षंढांनो असेच जगाला? 


स्साला, त्या  इसिस सारखेच तुम्ही पण तितकेच विकृत आहात रे..

Feeling Frustrated...! 😡

Saturday, 20 June 2015

मोह मोह के धागे..!

" ये मोह मोह के धागे..
तेरी उंग्लीयो से जा उल्झे.."

" सा रे ग ग ग ग म' रे सा नी..
नी रे प रे ग रे सा नी सा सा.. "

काय कमाल गाणं आहे राव..!
अन्नु मलिक काकांनी ब-याच काळानंतर इतकं छान गाणं केलय..!



है रोम रोम इक तारा..
जो बादलों मेंसे गुजरे..!
" प म' ग ग म' म' प प  'ध 'ध
नी नी 'ध 'ध नी 'ध 'रे नी 'ध प म' ग म' ग..!"
खल्लास...!
इथे मलिक काका'ना
 "चलती है क्या नौ से बारा" नी तत्सम गोष्टी माफ होतात..!

ह्याला ' सुर-संगत ' म्हणतात..!
ह्या संगतीत स्साला, कोणी पण काही पण करुन जातो..!

पुर्ण गाणं येथे ऐका :
https://m.youtube.com/watch?v=JbDktrsnH40

सत्कारणी शनिवार...!

अजुन काय हवंय?

शनिवार रात्र....
आपली बायको नी आपलं बाळ दोघांनाही ( Good Night Formalities करुन )  झोपवायचं...
मग  स्वयपाकघरातल्या शीतकपाटाला साक्षीठेवुन आपला ग्लास भरायचा..

ग्लास भरतो न भरतो तोवर आपल्या अत्यंत प्रिय अशा (चतुष्पाद ) मित्राने स्वयपाकघराच्या खिडकीतुन आपलं कृष्णवर्णीय मुखकमल दर्शवित ' मी जागा आहे' ची ग्वाही द्यायची..

नी पुढचे तीन तास द्वादशीच्या धुंद चांदण चुड्यात  ह्या जीवश्चासोबत सुखादु:खाच्या गोष्टी करत रात्र जागवायची..
आता ग्लास सुटतोय..
चंद्रही बराचसा पश्चिमेला कलतोय...
आमचा मित्र आळोखे देउ लागलाय..
ही घडी हलकेच धरायची..
खुर्ची सोडुन जमिनीवर यायचं..
आपल्या मित्राचं तोंड मांडीवर घेउन त्याला गुंगी येइस्तोवर ' मै ज़ि्ंदगी का साथ निभाता चला गया" असं गुणगुणत थोपटत राहायचं...

आता आपला दोस्त पारच गुंगलाय..
आपणही "फिक्र को धुए मैं" वरुन
" ज़िंदगी ख़्वाब हैं, ख़्वाब मै सच है क्या, और भला झुठ है क्या ?" वर आलोय...
आता शांत पणे एखादा कैलास खेर " सैंया..       सैंया..         तुजो छुंले प्यारसे, आरामसे मर जाऊँ" घेतलाय नी लगेच..       "आवारा हूँ..       आवारा हूँ..  या गर्दीश मैं हूँ आसमान का तारा हूँ" म्हणत सुंदर भैरवी घेतल्ये..!
एव्हाना एकीकडे संपलेला ग्लास धुवुन ओट्यावर पालथा पडलाय, सोडाबाटली केराच्या टोपलीथ गेल्ये....
मोकळ्या आकाशाखाली शांतपणे पहुडलेल्या माझ्या मित्राला शुभ रात्री करुन निजधामाला पोहोचलोय..




अशा रितीने अजुन एक शनिवार सत्कारणी लागला..
चला,
उद्या सकाळी ७ ला ( आमचं पोर उठतं म्ह्णुन) उठायचय .. !

शुभ रात्री..!